शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय

ग्रंथालयाची स्थापना

शंकर ब्रह्मे एक विख्यात पुरोगामी स्थापत्यविशारद व लॅंडस्केप डिझायनर होते. पुणे विद्यापीठाच्या पार्क्सचे काम त्यांनी बारा वर्षे सांभाळले. ऐन उमेदीच्या काळात त्यांचा अकाली मृत्यू झाल्यावर त्यांच्या पत्नी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, मार्क्सवादी विचारवंत, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे (ऊर्फ सुलभाताई) यांनी १९६९ मध्ये ग्रंथालयाची स्थापना केली व अखेरपर्यंत त्यांनी ग्रंथालयाच्या कामाची धुरा वाहिली.


ग्रंथालयाचे काम

मुख्यत: प्रबोधनपर वा वैचारिक साहित्यावर भर असलेल्या या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ मार्क्सवादी व पुरोगामी ग्रंथांचा समावेश आहे व सर्व प्रकारच्या सामाजिक-आर्थिक अंगांना भिडणारे वैचारिक धन समाविष्ट आहे. परंतु ग्रंथालयाने केवळ पुस्तके जमा करावीत व ती वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत एव्हढ्या सीमित उद्देशाने सुलभाताईंनी ग्रंथालयाची स्थापना केली नव्हती. पुरोगामी चळवळींना एकत्र प्रबोधनपर आणून त्यांना बळ कसे मिळेल हा त्यांचा ध्यास होता. त्या दृष्टीने ग्रंथालयाने अनेक उपक्रम हाती घेतले. सामाजिक-आर्थिक अभ्यास हाती घेतले. व्यासपीठे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रबोधनपर साहित्य व व्याख्याने योजली. तातडीच्या ज्वलंत प्रश्नांवर सोप्या सर्वांना परवडतील अशा पुस्तिका प्रकाशित केल्या. चळवळींना, पुरोगामी गटांना सभा-बैठकांसाठी जागा उपलब्ध करून दिली.


सुलभाताईंच्या मृत्यूनंतर

१ डिसेंबर २०१६ रोजी सुलभाताईंचा अचानक मृत्यू झाला. नोटाबंदीच्या जनतेवरील घातक परिणामांबद्दलचा लेख त्यांनी नुकताच लिहिला होता. त्याआधीच्या आठवड्यात पुरंदरला भेट देऊन त्यांनी तिथल्या विमानतळविरोधी शेतकरी आणि स्थानिकांच्या संघर्षाला समर्थन दिले होते. त्यांचा मृत्यू त्यांच्यासह सर्वांना अनपेक्षित होता. त्यांनी मृत्यूपत्राद्वारे त्यांची साधनसंपत्ती ग्रंथालयाला देऊन ग्रंथालयावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात सर्व सोपस्कार रीतसर पार पडण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे ग्रंथालयाचे काम सध्या विस्कळित झालेले आहे. व सर्व काही आलबेल होईपर्यंत बराच काळ जाईल अशी शक्यता आहे. तरीही सध्या आम्हाला जितके शक्य होईल तितके उपक्रम घेत राहू व सर्व सोपस्कार पार पडल्यावर सुनियोजित उपक्रमांच्या आधारे पुन्हा तुमच्यासमोर हजर होऊ. तोवर संपर्कात राहा. आमच्या संकेतस्थळाला भेट देत राहा.