डॉ. सुलभा ब्रह्मे

अर्थतज्ज्ञ, मार्क्सवादी विचारवंत, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या

२ फेब्रुवारी १९३२ – १ डिसेंबर २०१६


ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे १ डिसेंबर २०१६ रोजी अल्पशा आजारानंतर निधन झाले. त्या ८४ वर्षाच्या होत्या. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्या कार्यरत होत्या. नोटाबंदीच्या जनतेवरील घातक परिणामांबद्दलचा लेख त्यांनी नुकताच लिहिला होता. गेल्याच आठवड्यात पुरंदरला भेट देऊन त्यांनी तिथल्या विमानतळविरोधी शेतकरी आणि स्थानिकांच्या संघर्षाला समर्थन दिले होते.

सुलभाताईंचा जन्म साताऱ्याचा. भारताचे विख्यात अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई गाडगीळ (काळे) यांच्या त्या कन्या होत. त्यांचे बालपण पुण्यात गेले. हुजुरपागेत शिक्षण घेतल्यानंतर सर परशुरामभाऊ कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी त्यांनी घेतली. पुणे विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेतून कापड उद्योगावरती पीएचडी केली. पुढे त्यांनी संस्थेत प्रपाठक म्हणून काम केले व रजिस्ट्रार पदाची जबाबदारी सांभाळली. पीएचडी नंतरचे संशोधन त्यांनी १९५८ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये केले. १९६६ मध्ये त्यांनी सोविएत युनियन मध्ये जाऊन प्रादेशिक व नागरी नियोजनाचा अभ्यास केला, तसेच अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात नियोजनावर विशेष अभ्यास केला.
१९५९-१९९२ ह्या दरम्यान गोखले इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनपर काम करत असताना त्यांनी सामाजिकदृष्ट्या उपयुक्त अनेक अभ्यास हाती घेतले. मराठवाड्याचा विभागीय विकास आराखडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जमीन वापर हे त्यातील महत्त्वाचे अभ्यास. त्याचबरोबर नागरीकरण आणि नागरी नियोजन, बदलती ग्राम अर्थव्यवस्था, ग्राम विकास आणि प्रादेशिक नियोजन, जमीनवापर, दुष्काळ, सिंचन व ऊर्जा नियोजन, दलित-आदिवासी समाजाचा आर्थिक विकास, कृषी, उर्जा व औद्योगिक विकासातले पर्याय ह्या विविध विषयांमध्ये त्यांनी सर्वेक्षण आणि धोरणात्मक अभ्यास केला.  

१९७२ ते १९७७ या काळात त्या महाराष्ट्र बँकेच्या संचालक मंडळाच्या, तसेच १९८७-१९९३ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टच्या विश्वस्त व कार्यकारी मंडळाच्या सदस्य होत्या. १९७७ ते १९८४ या काळात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेल्या “बायजा” ह्या द्वैमासिकाच्या संस्थापक संपादक मंडळ सदस्य म्हणून काम केले. गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्य, तसेच समाजविज्ञान अकादमी, आर. जी. रानडे स्मृती ट्रस्ट आणि भाई विष्णुपंत चितळे स्मृती प्रतिष्ठानाच्या त्या विश्वस्त होत्या. शिक्षण प्रसारक मंडळीच्या त्या आजीव सदस्य होत्या.

अर्वाचीन आर्थिक प्रश्न आणि संशोधनाचा प्रसार लोकांमध्ये करण्यासाठी १९६९ मध्ये त्यांनी शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाची स्थापना केली. विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, संशोधन, व्याख्याने, परिसंवाद, अनेकविध पुस्तिका आणि ग्रंथांची प्रकाशने ह्या माध्यमातून आणि लोकजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी हा मंच कायम कार्यरत ठेवला. ब्रह्मे ग्रंथालय हे डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष परिवर्तनवादी विचारांचे एक केंद्र बनले.

लोकविज्ञान संघटनेच्या संस्थापक सदस्य म्हणून त्या गेली ३६ वर्षे सक्रीय होत्या. पुरोगामी महिला संघटना, बायजा ट्रस्ट आणि एकूणच स्त्री मुक्ती चळवळीचा त्या मोठा आणि सक्रीय आधार होत्या. प्रचलित विकास नीतीवर परखड टीका करत पर्याय त्या हिरिरीने मांडत.
२००४ मध्ये ब्रह्मे ग्रंथालयाच्या माध्यमातून “लोकायत व्यासपीठ” ची स्थापना करून कृषी, शिक्षण, आरोग्य, संस्कृती इत्यादि क्षेत्रात पर्यावरणवर्धक आणि लोककेंद्री विकासाचे प्रयोग सुरू झाले. रायगड जिल्ह्यात नंदनपाडा येथून पेण व खालापूर तालुक्यात लोकायत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा प्रायोगिक प्रकल्प सुरु करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांचा पुढाकार, शास्त्रशुद्ध नियोजन आणि लोकसहभाग ही ह्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. पाणलोट विकास, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती इत्यादि माध्यमातून जमीन, पाणी, शेती, जंगल, चारा, पशुधन ह्यांचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि विकास करून उत्पादकता वाढवून, शाश्वत शेती उभी करून जीवनाची गुणवत्ता वाढवणे हे ह्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. तसेच दलालांपासून ग्रामीण श्रमिकांची उपजीविकेची संसाधने वाचवणे हा देखील त्याचा हेतू आहे.  

जागतिकीकरण विरोधी चळवळ, महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळ, नामांतर चळवळ, हिंदू-मुस्लिम एकतेच्या चळवळी, धर्मनिरपेक्ष आंदोलनांमधला त्यांचा सहभाग मोलाचा होता. अण्वस्त्र विरोधी आणि शांतता चळवळ, एन्रॉलन, जैतापूरसारख्या आंदोलनात विश्लेषक आणि कार्यकर्त्या अशी त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शाश्वत आणि जैव शेती, पाणलोट विकास, आणि एकूणच शेतीच्या अर्थकारणाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. उत्पादक ते उपभोक्ता हे दुवे जोडण्याबद्दल तसंच सहकार चळवळीविषयी त्यांना कायम आस्था होती.

त्यांनी लिहिलेले वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-राजकीय विषयांवरचे अनेक अभ्यासपूर्ण लेख, व प्रकाशित केलेल्या ५० हून अधिक पुस्तिका आणि ग्रंथ कार्यकर्त्यांसाठीचा अमोल ठेवा आहेत. त्यांच्या विविधतेतून त्यांचा व्यासंग लक्षात येतो. उदाहरणार्थ, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विळख्यात भारत, दुष्काळ लोकवैज्ञानिक नियोजनाचा, एन्रॉतनचा दाभोळ प्रकल्प: देशविकाऊ धोरणांचा अस्सल नमुना, कोकण विकासाची दिशा, वाढत्या लोकसंख्येची भीती कोणाला?, डिझेल दरवाढ, बेरोजगारीचे अनर्थशास्त्र, गॅट करार-पेटंट कायदाः गुलामीच्या नव्या शृंखला, अणुयुद्धाचा भस्मासुर - हिरोशिमा ते भारत-पाक, सार्वजनिक तेलव्यवस्थेचा विध्वंस, गुजरातकांड, शेतकरी जात्यात, महागाई कशामुळे वाढते?, देशविकाऊ तेल धोरणाचा पर्दाफाश, अंधेरनगरी एन्रॉंन राजा, खरे दहशतवादी कोण?, इंग्रजी माध्यमाचे वेड, साम्राज्यशाही, गाडा महागाईचा भस्मासुर, शासन पुरस्कृत लूट, जागतिकीकरण की लोककेंद्री विकास, काश्मीरः वास्तव आणि पर्याय, गोवंश हत्याबंदीचे रहस्य, दास कापिटाल–सुबोध परिचय (ले. सुहास परांजपे) इत्यादि इत्यादि.
ह्यावातिरिक्त त्यांनी धनंजयराव गाडगीळ ह्यांच्या लिखाणाचे महत्वपूर्ण ग्रंथ संपादित केले  - The Writings & Speeches of Professor D.R. Gadgil (Edited): On Co-operation (1975); On Economic & Political Problems (1981), The Indian Economy: Problems and Prospects: Selected Writings of D. R. Gadgil (Ed.) Oxford University Press, 2011

परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतल्या विविध प्रवाहांशी त्यांचे जवळचे नाते होते. अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, संघटना, कामगार चळवळींना भरघोस आर्थिक-भौतिक आधार देणाऱ्या सुलभा ब्रह्मेंची स्वतःची राहणी मात्र अतिशय साधी होती. स्वतंत्र बाण्याच्या सुलभाताई एकट्या राहत असत, परंतु त्यांचे घर सगळ्या कार्यकर्त्यांसाठी कायम खुले असायचे. आपल्या सर्व व्यक्तिगत संपत्तीचा उपयोग त्यांनी केवळ चळवळींसाठी केला.

सुलभा ब्रह्मे ह्यांच्या निधनामुळे देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या अभ्यासक, डाव्या व पुरोगामी चळवळीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा एक मोठा आधार हरपला आहे. त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.