मागोवा आणि तात्पर्य या मासिकांचे प्रकाशित झालेले सर्व अंक या संग्रहात उपलब्ध करून देत आहोत. मागोवा (एप्रिल १९७२ ते मे १९७६) आणि तात्पर्य (एप्रिल १९७८ ते डिसेंबर १९८७) या दोन मासिकांचे महाराष्ट्राच्या त्या काळातल्या वैचारिक व सांस्कृतिक जीवनामध्ये एक महत्त्वाचे योगदान आहे असे आम्हाला नम्रपणे म्हणावेसे वाटते. शहरी व ग्रामीण श्रमिक जनता, दलित, स्त्रिया, युवक व विद्यार्थी, इत्यादी जनविभागांच्या आंदोलनांची चिकित्सक पाठराखण या मासिकांमध्ये केली जात असे, आणि त्याचबरोबर सैद्धांतिक पातळीवर क्रांतिगामी विचारांच्या विविध प्रवाहांचा उहापोह व चर्चा सतत होत असे. नव्या युगातल्या नव्या प्रश्नांना खुलेपणाने व सर्जनशील पध्दतीने सामोरे जाणा-या जगभरच्या नव्या मार्क्सवादी विचारांची सखोल चर्चा येथे होत असे. ज्येष्ठ विचारवंतांबरोबरच अनेक तरूण डाव्या व परिवर्तनवादी विचारशील लेखकांचे आणि कार्यकर्त्यांचे लेखन मागोवाने प्रसिध्द केले होते.
असा हा अमोल ठेवा असणारे या दोन्ही मासिकांचे सर्व अंक, अभ्यासकांना व क्रांतीच्या मार्गाचा गंभीरपणे शोध घेणा-या तरूण वाचकांना येथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
या संग्रहातील कोणताही मजकूर तुम्ही वाचू शकता तसेच मुक्तपणे तो डाऊनलोडसुध्दा करून घेऊ शकता.
मागोवा व तात्पर्य इथे उपलब्ध आहेत हे मित्रांना जरूर सांगा.
सुधीर बेडेकर
संपादक. ‘मागोवा’ व ‘तात्पर्य’
सुधीर बेडेकर यांनी आम्हाला सक्त ताकीद दिली होती की हे समग्र संग्रह उपलब्ध करताना त्यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाखेरीज ‘मागोवा’, तात्पर्य अथवा स्वतः सुधीर बेडेकर यांच्याबद्दल आणखी कोणताही मजकूर येथे छापू नये. त्यांच्या ताकिदीला मान देऊन आम्ही त्यांचे वरील प्रास्ताविक इथे दिले आहे.
हा संग्रह शक्य तितका वाचनीय बनवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आहे परंतु तरीही काही पानांच्या मजकुरात त्रुटी राहून गेल्या आहेत त्याबद्दल दिलगीर आहोत. दोन्ही मासिकांच्या ज्या प्रती स्कॅन केल्या गेल्या, त्या मुळातच सुस्थितीत नव्हत्या. बेडेकरांनी आधी केलेल्या स्कॅनमध्येही काही त्रुटी होत्या, काही पाने उपलब्ध नव्हती, काहींची पाने डागळली होती, इत्यादी. त्यानंतर एमकेसीएलने त्या पुन्हा स्कॅन केल्या. त्यातून वाचनीयता बरीच वाढली, तरीही मूळ प्रती सुस्थितीत नसल्याच्या मर्यादा पूर्णपणे ओलांडता आलेल्या नाहीत तरीही त्या मासिकांचा ठेवा जतन करण्यामधले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पुणे विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी स्कूल (ह्युमॅनिटीज व सोशल सायन्सेस) या विभागाचे प्रमुख डॉ. राजा दीक्षित, डॉ. श्रीकांत बोत्रे यांनी अत्यंत आस्थेने पहिले स्कॅन पूर्ण केले. एमकेसीएलने प्रतींचे पुन्हा स्कॅन केले व तात्पर्यच्या सुधारित पीडीएफ उपलब्ध करून दिल्या. एमकेसीएलचे डॉ. विवेक सावंत, उदय पंचपोर, विकास चव्हाण आणि सहकाऱ्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आमचे कार्यकर्ते सिद्धोधन साबळे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक जुने स्कॅन व एमकेसीएलचे स्कॅन यांची जुळणी करून मागोवाचे अंक वाचण्याजोग्या अवस्थेत आणले. या सर्वांचे आम्ही अतिशय आभारी आहोत.