१९६९ मध्ये सुलभाताईंनी स्थापन केलेल्या ग्रंथालयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने आम्ही काही ठोस उपक्रम हाती घेण्याचे योजत आहोत. आमचे लक्ष्य असे आहे की पुढील दोन वर्षांत संस्थेची संघटना व उपक्रम यांची पायाभरणी होऊन त्यांना सातत्य लाभावे, तसेच पुणे, मुंबई, नागपूर सहित महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी ग्रंथालयाच्या साहाय्याने कृतीपर पुरोगामी विचारांभोवती पुरोगामी प्रवाहांना एकत्र आणणारी लोकायत व्यासपीठे उभी राहावीत व ती पुढील काळात क्रियाशील व्हावीत. त्या दृष्टीने आम्ही खालील उपक्रम हाती घेत आहोत.
-
ग्रंथालय: ग्रंथालयातील सर्व पुस्तके, पुस्तिका, नियतकालिके, अहवाल इ. सर्व सामुग्रीची रीतसर संगणकीय नोंदणी करणे व ती लावणे. त्यासाठी आवशयक त्या ग्रंथपालकीय व संगणकीय मनुष्यबळाची सोय करणे. ग्रंथालयातील पुस्तकांसाठीची जुनी लाकडी कपाटे बरीच खराब झाली आहेत. त्यामुळे पुस्तके खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे नवी कपाटे घेऊन ही सर्व पुस्तक संग्रहाची व्यवस्था लावणे आणि इतर सामुग्री ठेवण्यासाठी आवश्यक ती जादाची कपाटे इ. सोय करणे, ग्रंथ संदर्भासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी सोय करणे, ग्रंथालयाचा कॅटलॉग संकेतस्थळावर तसेच शैक्षणिक, संशोधन, व्यावसायिक आदि संस्थांना उपलब्ध करून देणे इ.
-
संकेतस्थळ: सध्या संकेतस्थळ अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. त्याचे सर्व कक्ष अजून कार्यशील झालेले नाहीत. पहिला टप्पा म्हणून ग्रंथालयाच्या आतापर्यंतच्या सर्व पुस्तिका व इतर प्रकाशित साहित्य संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. त्यापैकी १२ पुस्तिका नजीकच्या काळात संकेतसथळावर टाकल्या जातील. संकेतस्थळ परस्परसंवादी बनून, ग्रंथालय व ग्रंथालयाचे आश्रयदाते व वापरकर्ते यांच्यातील ते संपर्काचे माध्यम बनणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्याची पुनर्रचना व पुनरुभारणी करणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी प्रथम बऱ्यापैकी नियोजन, निधी व श्रमांची गरज आहे, परंतु एकदा प्रस्थापित झाल्यावर ते चालू ठेवण्यास तेवढी श्रम-सामुग्री आवश्यक असणार नाही.
-
संस्थेचे हॉल व इतर जागा: कल्पना अशी आहे की या जागा पुरोगामी प्रवाहांच्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय मंथनाचे व व्यवहाराला बळ देणारे केंद्र बनाव्यात. संस्थेचा लोकायत हॉल तिथे नाटकाच्या तालमी व शंभरएक माणसांसमोर प्रयोग करता यावेत या पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. परंतु ती व्यवस्था बरीच जुनी आहे. तिचे आवश्यक ते किमान नूतनीकरण आवश्यक आहे. तीच गोष्ट सेमिनार हॉल आणि मोठ्या हॉललाही लागू पडते. त्यांचेही किमान नूतनीकरण आवश्यक आहे. तसे झाले की मग या जागा पुरोगामी प्रवाहांच्या प्रयोगशील सांस्कृतिक व्यवहाराला अधिक उपयुक्त होतील व त्या पद्धतीने त्या वापरल्या जाऊ शकतील. या जागांचा उपयोग हा व्याख्याने व बैठका यांबरोबरच कार्यशाळा, नाटके, पथनाट्ये, अभिवाचने, पुस्तक प्रदर्शने इ. साठी तितकाच होऊ शकेल.
-
व्याख्याने व चर्चा: वर्षातून किमान चार ते सहा महत्त्वाच्या विषयांवर कृतीपर व्याख्याने व चर्चा. कल्पना अशी आहे की या प्रत्येक व्याख्यान व चर्चा यांच्यावर आधारित एक पुस्तिका प्रकाशित केली जाईल. तसेच त्याची चित्रफीतही उपलब्ध केली जाईल. चित्रफीत व पुस्तिका यांच्या आधारावर या विषयावरील चर्चा इतरही ठिकाणी घेता येईल.
-
अन्यभाषिक व जागतिक पुरोगामी सिनेमा-साहित्य-कला इत्यादी: आज राजकीय-सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात मोठा झालेला बदल म्हणजे छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नवशिक्षित वर्ग. अवस्था अशी आहे की या सर्व गोष्टी मुख्यतः इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळे या वर्गाला त्या सहजपणे उपलब्ध होत नाहीत. बुक-रिडिंग-क्लब, पुस्तक परिचय लेख/कार्यक्रम इत्यादींसारख्या उपक्रमांतून या समस्येला भिडता येईल. चित्रपटांच्या बाबतीत मराठी सब-टायटल्स हाही एक मार्ग आपल्या आवाक्यातला ठरू शकतो.
-
स्थानिक लोकायत व्यासपीठे: लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार करता वरील प्रकारचे उपक्रम हे केवळ ग्रंथालयाच्या माध्यमातून केवळ पुण्यात होणे पुरेसे नाही. जागोजागी असे उपक्रम स्वतःहून व स्वयंस्फूर्तपणे घेतले जात राहिले तरच नजीकच्या काळात पुरोगामी विचार टिकून राहील, मूळ धरेल व पसरेल. यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात शक्य तितक्या जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थानिक समविचारी व्यक्ती, संस्थांच्या मदतीने अशा प्रकाराचे उपक्रम राबवू शकतील अशी लोकायत व्यासपीठे उभी करणे हे ग्रंथालयाचे लक्ष्य आहे. अशा व्यासपीठांचे जाळे हेच पुढील काळात सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय परिवेशातील पुरोगामी प्रवाहांचा हस्तक्षेप प्रभावी बनवण्यास मदतकारक ठरेल.
सहकार्य आणि सहयोग
शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाला ह्या वाटचालीत आपल्या सहकार्याची आणि सहयोगाची अत्यंत गरज आहे. आपण,
-
वरील कोणत्याही उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकत असाल किंवा तो संघटित करण्याची जबाबदारी घेऊ शकत असाल,
-
ग्रंथालयाच्या पुस्तिकांच्या आधारे किंवा स्वतंत्रपणे एखाद्या विषयावर पुरोगामी भुमिकेतून व्याख्यान देऊ शकत असाल, त्यासाठी साध्या प्रवासखर्चाच्या आधारे इतरत्र जाऊ शकत असाल,
-
दास कापिटाल: सुबोध परिचय हे पुस्तक व ग्रंथालयाच्या पुस्तिका यांच्या वितरण आणि विक्रीची जबाबदारी घेऊ शकत असाल,
-
स्थानिक पातळीवर लोकायत व्यासपीठ किंवा त्यासारखे एखादे व्यासपीठ उभे करू इच्छित असाल,
-
इतर कुठल्याही प्रकारे वेळ देऊ शकत असाल,
-
आणि, तितकेच महत्त्वाचे, संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदत करू शकत असाल,
तर कृपया तुमच्या सूचना व प्रस्तावासह आमच्याशी पत्राद्वारे किंवा ईमेलने संपर्क साधा.
संपर्क माहितीसाठी `संवाद व संपर्क' या बटणावर क्लिक करा.